
Vinod Gatha By Pralahad Keshav Atre
ज्यांनी आयुष्याचा बरावाईट आणि कडूगोड असा सर्व अनुभव घेतलेला आहे, ज्यांच्या अंत:करणांतून मानवजातीबद्दलच्या सहानुभूतीचा जिवंत झरा वाहत आहे आणि सर्व मानवजात सुखी आणि आनंदी व्हावी, अशी ज्यांच्या अंत:करणाला रात्रंदिवस तळमळ लागून राहिलेली आहे, अशा उमदार आणि दिलदार माणसालाच आयुष्यांत विनोदाचा साक्षात्कार होतो. हलकट आणि लबाड माणसें कधीही विनोदी होऊ शकत नाहीत. देवादिकांनी समुद्रमंथन करून चौदा रत्ने बाहेर काढली. त्यांमध्ये त्यांना विनोदाचे रत्न कसे काय सापडले नाही? जे देवादिकांना सापडले नाही ते माणसाला मिळाले. संसारातल्या सर्व अनुभवांचे जो एकसारखे मंथन करत राहतो, त्यालाच अखेर हे विनोदाचे रत्न सापडते. विनोदाचे हे महत्व जेव्हा लोकांना कळेल तेव्हाच त्यांना समजेल की, आपल्याला हसविणारा विनोदी लेखक हा वेड्यावाकड्या आणि वात्रट शब्दांच्या कोलांटउड्या मारणारा कोणीतरी उथळ आणि मूर्ख विदुषक नसून, तो मानवजातीचा सर्वात मोठा उपकारकर्ता आहे.