
Nishabdache Maun by Dipti Joshi
मनाच्या जाणिवा जेव्हा सजग झाल्या त्या क्षणी हे प्रकटीकरण झालं. या प्रवासात अनेक थांब्यांवर वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा आनंद आणि दु:खाच्या कडेलोटाचे क्षण जणू मीच जगत होते; इतकी मी त्या क्षणांशी समरस झाले. नऊ महिने स्त्रीने आपल्या अपत्याला प्रेमाने सांभाळावे तशी ही कथाबीजं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जोपासली आणि प्रत्येक लिखाणानंतर नव-निर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळाला. ‘नि:शब्दाचे मौन’मधील आई-वडील, भावंडांच्या प्रेमाला आसुसलेला समीर, हट्टी निग्रही, स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणारी वरून फणसासारखी काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असणारी ‘श्यामची आजी’, नवीन वर्षाचं स्वागत करताना, ‘प्रत्येकाशी आईच्या भूमिकेतून वागायचं.’ असा चारच शब्दांचा पण आचरणात आणायला अत्यंत अवघड असा संकल्प करणारी, हा संकल्प पार पाडताना नायिकेच्या मनावर राग-लोभांनी मिळवलेला ताबा आणि मनाची होणारी घालमेल अशी ‘विश्वामित्राची तपश्चर्या’ किंवा आपल्या स्वप्नातलं आयुष्य आपल्या पेशंटला जगताना पाहून एका प्रथितयश डॉक्टरची होणारी चिडचिड, संताप, डॉक्टर म्हणून कर्तृत्वशाली तरीही अतृप्त प्रवासाचे ‘प्रतिबिंब’!