
Nakshatrachitre by Shanta Shelke
‘नक्षत्रचित्रे’ हे या पुस्तकाचं शान्ताबाईंनीच योजलेलं नाव. अगदी अन्वर्थक. त्यांच्या स्नेहसंबंधांच्या अवकाशात चमकणार्या काही नक्षत्रांसारख्या माणसांवर लिहिलेल्या लेखांच्या या संग्रहाला हे नाव अगदी शोभणारंच आहे. या पुस्तकात ज्यांच्याविषयी त्यांनी लिहिलं आहे ती माणसं सामान्य नव्हेत. त्यांचं कलावंत म्हणून किंवा लेखक म्हणून मोठेपण शान्ताबाईंनी ध्यानात घेतलं आहेच; पण भालजींचं मोठं कुटुंब, त्या कुटुंबातली माणसं आणि त्यांच्या परस्परसंबंधांचं सहज झालेलं दर्शन; प्रत्येक गाणं ही एक परिपूर्ण कलाकृती असावी यासाठी असणारा बाबूजींचा म्हणजे सुधीर फडके यांचा आग्रह; कुसुमाग्रजांचं घर, त्यांच्या खोलीचं रंगरूप, त्यांचा एकूण दिनक्रम; विजयाबाईंच्या घरी होणारं अगत्य, शैशवातला बालभाव अखेरपर्यंत जपणारा भा. रा. भागवतांचा निर्मळ निरागसपणा, इंदिराबाईंच्या घरापुढची बाग, वपुंच्या हरहुन्नरीपणाची त्यांच्या घरात होणारी ओळख, रणजित देसाईंचं कोवाडचं घर आणि तिथला त्यांचा वावर - शान्ताबाई या अशा कितीतरी गोष्टी सहजपणे टिपत सांगत जातात आणि लेखक-कलावंतांच्या जोडीनं आपल्याला माणूस म्हणूनही त्या त्या व्यक्ती भेटत राहतात. - अरुणा ढेरे