
Kimayagar by Achyut Godbole
सुरुवातीलाच एक प्रांजल कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करुन दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळ्या विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील; ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. - पद्मविभूषण वसंत गोवारीकर