Chakrivadal by Prabhakar Petharakar

Chakrivadal by Prabhakar Petharakar

  • Rs. 112.00
  • Save Rs. 38


Join as Seller

महासागराच्या तळाशी झालेल्या धरणीकंपानं उठवलेल्या महाकाय लाटेनं केलेल्या मनुष्यहानीनं आणि घरादारांच्या विनाशानं आज सगळं जग हादरलं आहे. जगभरातले असंख्य हात आणि मदतीचा ओघ पुनर्वसनासाठी करुणेनं पुढं होत आहेत. त्याची आठवण करून देणारी, सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी आंध्रच्या सागरकिना-यावर घोंगावत आलेल्या राक्षसी चक्रीवादळाच्या हाहाकाराची ही विदारक कहाणी आहे. मनाचा थरकाप उडवणा-या त्या रुद्र वास्तवाचं विदीर्ण व विषण्ण करणारं चित्रण व्यवसायाचा भाग म्ह्णून प्रभाकर पेंढारकर यांनी कमे-यात बंदिस्त केलं; तरीही त्यांच्यामधला सर्जनशील लेखक इतकी वर्षं उलटून त्या मुळापासून हादरवून टाकणा-या अनुभवानं अस्वस्थच राहिला: आज ’चक्रीवादळ’ या कादंबरीच्या रूपानं त्यांची ती अस्वस्थताच मूर्त होत आहे. हा हाहाकार जसा अगणित गोरगरीब आणि सुखवस्तू माणसांच्या भेदातीत मॄत्यूचा, तसा मागं उरलेल्यांच्या अनेक स्वप्नांचा व आकांक्षांचाही; त्यांच्या हतबल मनांचा तसा आपल्याच घरादारांतून निर्वासित होण्याच्या असहायतेचा व निराधारतेचाही. हा हाहाकार पिढयानपिढयांना विकल करणारा; पण त्याला शांतवण्याचा प्रयत्न करणारी यातली माणुसकीची तितकीच समर्थ सत्त्वशील करुणा मात्र चकित व शाश्वत करणारी. ’चक्रीवादळ’ ही कादंबरी असूनही त्यातली वळणं रूढानं कादंबरीसारखी नाहीत. आहे तो एक वाडमयीन कोलाज: एकाच भयाण वास्तवाच्या असंख्य छटांचा. निर्घृण मृत्यूनं पोळलेली मनं, त्यांच्या प्राणान्तिक जखमा, तरी जगण्याचा अपरिहार्य, दुर्दम्य संघर्ष आणि या संघर्षाला सावरणारे मदतीचे उबदार हात- या सा-यांचाच. पेंढारकरांच्या ’रारंग ढांग’ या कादंबरीनं आपली मुद्रा मराठी वाचकांच्या मनावर खोल उमटवली आहे- ’चक्रीवादळ’ ही वास्तवदर्शी कादंबरी पुढचं वेगळं नि प्रभावशाली पाऊल आहे.


We Also Recommend