Amaltash By Supriya Dixit

Amaltash By Supriya Dixit

  • Rs. 199.00
  • Save Rs. 176


Join as Seller

आपल्या ललित लेखनातून लंपनचे निरागस, अद्भुतरम्य आणि अनोखे भावविश्व निर्माण करणारे लेखक प्रकाश नारायण संत यांच्यासोबतच्या सहजीवनाचे उत्कट चित्रण करणारे त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया दीक्षित यांनी लिहिलेले पुस्तक.

ई-सकाळ २४ नोव्हेंबर २०१३
'प्रकाशा'चे कवडसे पकडणारं 'अमलताश'
- डॉ. नीलिमा गुंडी
सुप्रसिद्ध ललित लेखक प्रकाश संत (ऊर्फ भालचंद्र दीक्षित) यांच्या पत्नी सुप्रिया दीक्षित यांनी पतीनिधनानंतर स्वत-ला सावरण्यासाठी पतीच्या आठवणींचा आधार घेतला. त्यातून तयार झालं "अमलताश' हे पुस्तक. या पुस्तकातून त्यांच्या सहजीवनाचं चित्र आहे. 
हे सहजीवनचित्र लहानपणीचा मित्र असलेल्या चंदूच्या आठवणींपासून सुरू होतं. पुढं प्रियकर आणि नंतर पती या भूमिकांमधून त्यांच्यातलं नातं परिणत आणि परिपक्व झालेलं दिसतं. "अमलताश' हे त्यांच्या कर्‍हाड इथल्या घराचं नाव होय. पुस्तकाच्या शीर्षकासाठी ते काव्यात्म ठरतं. 
सुउप्रिया दीक्षित (माहेरच्या सुधा ओळकर) यांनी सुरवातीला स्वत-च्या आजोळच्या घराचं - बेळगावमधल्या "रत्नाकरप्रसाद' या वास्तूचं - केलेलं वर्णन भरघोस तपशील आणि चित्रदर्शी शैलीमुळं मनोवेधक झालं आहे. माहेरी परत आलेल्या आपल्या आईविषयी सुप्रियाताईंना विलक्षण ममत्व आहे; तसंच वडिलांच्या सहवासाला मुकलेल्या चिमुकल्या सुधाला मायेचं छत्र देणार्‍या आजी-आजोबांविषयी अभिमानयुक्त जिव्हाळाही आहे. चंदू ऊर्फ प्रकाश हा कवयित्री इंदिरा संत व लघुनिबंधकार ना. मा. संत यांचा मुलगा. (इंदिराबाईंच्या नात्यातल्या दीक्षितांकडं तो दत्तक दिला होता). सुधाची आई व इंदिरा संत या एकाच शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्यांत मैत्री होती. त्यामुळंच सुधा आणि चंदू यांच्यातली मैत्री वाढत गेली. 
सुधानं वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईला जाणं, चंदूने जिऑलॉजी या विषयात करिअर करणं, चंदूनं सुधाला घातलेल्या लग्नाच्या मागणीला अनेक दडपणांमुळं सुधानं मनाविरुद्ध नकार देणं आणि पुढं तिचं शिक्षण संपल्यानंतर त्यांच्या आंतरजातीय विवाहाला दोन्ही घरांनी मान्यता देणं...हा त्यांच्या आयुष्यातला मोठाच भावनिक चढ-उतारांचा कालखंड होता. या कालखंडाचं आणि त्यातल्या मानसिक स्पंदनांचं दर्शन प्रत्ययकारी झालं आहे. कारण, त्यासाठी दोघांच्या पत्रांचा अस्सल असा आधार घेण्यात आला आहे. मराठी साहित्यात "कुसुमानिल' हा कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यातल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्याची आठवण व्हावी, इतकी यातली काही पत्रं बोलकी आहेत. त्या पत्रांमधून सुधा आणि चंदू या दोघांच्या व्यक्तिरेखांचे सूक्ष्म कंगोरे व्यक्त होतात. आई-वडिलांचा कलाप्रेमाचा व व्यासंगाचा वारसा जपणार्‍या चंदूची ओळख, चंदूचं निसर्गप्रेम, चित्रकला-संगीत या कलांमधली मर्मज्ञता आणि साहित्यप्रेम त्यातून प्रकट होतं. तरुण वयातले त्याचे अंतर्मुख वृत्तीतून आलेले विचार आणि स्वप्नं यांचंही दर्शन त्यातून घडतं. 
आपल्या जंगलातल्या नोकरीच्या अनुभवांविषयी प्रकाश संत एका पत्रात लिहितात - ""दगड फोडून पाहताना आणि प्रत्येक पाऊल टाकताना आयुष्याचा विमा उतरवावासा वाटतो.'' बाळबोध घरातून आलेल्या संकोची वृत्तीच्या सुधाला ही पत्रं आतून खुलवतात आणि विकासाची प्रेरणाही देतात. 
विवाहानंतर वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणार्‍या सुधाला व्यवसायानिमित्त काही वेळा घरापासून लांब राहावं लागतं. त्यामुळं सासरी गैरसमज होतात. कवयित्री व आईची मैत्रीण म्हणून इंदिराबाईंविषयी वाटणारं आदरयुक्त प्रेम आणि त्यांच्या पुरोगामी, कणखर व्यक्तिमत्त्वामुळं वाटणारं दडपण या कात्रीत सापडल्यामुळं सुप्रियाताईंना अनेकदा मनस्तापाला सामोरं जावं लागतं. 
इंदिराबाईंचं "सासू' या नात्यातलं या पुस्तकातलं चित्रण अगदी सांकेतिक ठशातल्या सासूचं नक्कीच नाही. तरीही सुनेला व्यवसाय करण्यासाठी भावनिक पाठबळ देण्यात त्या कमी पडल्या, याचं असमाधान लेखनातून व्यक्त होत राहतं. 
प्रकाश यांच्या लेखनाला आलेला बहर, त्यांच्या "लंपन'च्या कथांच्या "वनवास' या संग्रहाचं प्रकाशन, त्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद, उमा-अनिरुद्ध या गुणी मुलांमुळं लाभलेली सांसारिक तृप्तता या अनुभवांचे चित्रण सुप्रियाताईंनी अगदी समरसून केलं आहे. प्रकाश यांच्या प्रगल्भ सहवासात स्वत-त झालेले वैचारिक बदलही त्यांनी टिपले आहेत. प्रकाश यांचे आप्त, मित्र आणि चाहते यांचंही चित्रण यात समाविष्ट आहे. उत्तरायुष्यात दोघांना सातत्यानं अनुभवावी लागलेली आजारपणं, मुलगी उमा हिच्या विवाहाच्या अनपेक्षित निर्णयामुळं- त्यातल्या नव्या विचारांमुळं - मनाला आलेला कोरडेपणा असे काही कष्टदायक अनुभवही सुप्रियाताईंनी प्रयत्नपूर्वक पचवले आहेत. प्रकाश यांच्या अपघाती निधनानं बसलेला धक्का आणि त्यातून स्वत-ला सावरताना उसळलेला आठवणींचा कल्लोळ; असा हा लेखनप्रवास आहे. स्वत-ला मोकळं करण्याच्या निकडीतून निर्माण झालेल्या या लेखनाला काही मर्यादा पडल्या आहेत. यातली आजारपणांची तपशीलवार वर्णनं, मनात ठसठसणारे लहानसहान सल शब्दबद्ध करणं आदींना फाटा देणं शक्य होतं. सुप्रियाताईंच्या मते, सुरवातीला त्यांना "इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स' होता. पुढं त्यांनी प्रकाश यांच्या तुलनेत स्वत-चं मूल्यमापन केलं आणि "माझं पारडं जड व्हायला लागलं', असा निष्कर्ष काढला. हे वाचताना आत्मशोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न पुरेसा सखोल नसल्याचं जाणवत राहतं. तरीही प्रकाश यांच्याकडून "अॅडव्हेंचर इन सेकंड वर्ल्ड' करायची प्रेरणा मिळाल्यामुळंच सुप्रियाताईंनी केलेला हा शब्दप्रवास आहे. यातून पती-पत्नी नात्यातला दृढ बंध ठसतो; तसंच "शब्द' या माध्यमाच्या आंतरिक सामर्थ्याचं दर्शनही घडतं. सहचर, कलाकार आणि माणूस असं त्रिमिती-रूपातलं प्रकाश संत यांचं दर्शन ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. प्रकाश यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्रं आणि पद्मा सहस्रबुद्धे यांचं मुखपृष्ठ यामुळे पुस्तकाची आकर्षकता वाढली आहे.


 


We Also Recommend